बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा आढावा
छत्रपती संभाजीनगर २६मे (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) श्री. प्रकाश जाधव (भा.पो.से.) यांनी मंगळवार, दि. २६ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक (SP) म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेत आगामी बकरी ईद (ईद-उल-अझा) सणाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
बैठकीदरम्यान श्री. जाधव यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी (PI/API) यांच्याशी थेट संवाद साधून संवेदनशील भागांची माहिती घेतली. सणाच्या काळात जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच सोशल मीडियावरील अफवांवर कडक नजर ठेवण्यासह शांतता समितीच्या बैठका आयोजित करून सर्व धर्मीयांमध्ये समन्वय राखण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नागरिकांना आवाहन करताना पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था आणि जातीय सलोखा अबाधित राखणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील. आगामी बकरी ईदचा सण सर्व नागरिकांनी सामाजिक सलोखा राखून आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.”
प्रकाश जाधव यांच्या नियुक्तीनंतर ग्रामीण पोलिस दल अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसून येत असून, आगामी सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

